रेल्वेही पुरविणार प्रवाश्यांच्या जिभेचे चोचले!
पीटीआय
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेच्या खानपान सेवेतर्फे प्रवाश्यांना आगामी काळात दर्जेदार आणि स्वस्त अन्नपदार्थ मिळणार असून, प्रवाश्यांच्या तोंडाला पाणी आणणारे हे पदार्थ आता चक्क स्टेशनवरच उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांना यापुढील काळात प्रवासादरम्यान खमंग राईस फिश करी, व्हेजिटेबल बिर्याणी, छोले भटोरे आणि पराठा ऑम्लेट आदी नव्या पदार्थांची चव चाखता येणार आहे. विशेष म्हणजे या पदार्थांची किंमत प्रति थाळी केवळ वीस रुपये असणार आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. मात्र, याबाबतचा अधिकृत निर्णय रेल्वेमंत्रालयाकडून लवकरच अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
या नव्या योजनेमुळे स्टेशनवर सर्रास विकल्या जाणाऱ्या हलक्या आणि अशुद्ध प्रतीच्या अन्नपदार्थ विक्रीला प्रतिबंध बसणार आहे. या नव्या पदार्थांची विक्री केंद्रे प्रवाश्यांना सहज सापडावीत या उद्देशाने स्टेशनवर विशिष्ट जागांवरच त्यांची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या जाहिरातीचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे या सूत्राने सांगितले. सध्या रेल्वेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या खानपान सेवेचे धोरण बदलण्यात यावे अशा आशयाचे निवेदनही आरआरसीटीसीतर्फे रेल्वे मंत्रालयास देण्यात आले आहे.
आगामी काळात रेल्वेतर्फे देण्यात येणारी खानपान सुविधा चालविण्यासाठी बाजारातील प्रतिष्ठीत ब्रॅंडसना आमंत्रित करण्याची रेल्वेची योजना आहे. मात्र. सध्याच्या धोरणाअंतर्गत असणाऱ्या अटींमुळे कोणताही ब्रॅंड पुढे येण्यास तयार नसल्याचेही या सूत्राने सांगितले.
मिरज-पंढरपूर ब्रॉडगेजचे काम तातडीने पूर्ण करावे - कृष्णराव सोळंकी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर - मिरज ते पंढरपूर रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमधील रूपांतराचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी व हे काम वर्षअखेर पूर्ण करावे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे रोड पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी यांनी केली आहे. निवेदन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर सुरू आहे. वर्षभरापासून "देवाची गाडी' बंद आहे. काम संथ गतीने सुरू आहे; शिवाय कामासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात केवळ दहा ते बारा कोटींची तरतूद होते. यामुळे कामास विलंब होत आहे. मार्गावर कोठेही डोंगर, दऱ्या, मोठी नदी-नाले नाहीत. त्यामुळे येथे कोणतेच अडथळे नाहीत. ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास पूर्व-पश्चिम भाग रेल्वेने जोडला जाणार आहे. दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर-हैदराबाद हा मार्गही जवळचा होईल. रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी मात्र शंभर कोटींची गरज आहे. अपुऱ्या निधीमुळे हे काम रेंगाळल्यास हा खर्च दीडशे कोटींवर जाईल. कोल्हापूर ते सांगली मार्गावर पॅसेंजर व कोल्हापूरहून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवावी, कोल्हापूर ते पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करावे, कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामास अग्रक्रम द्यावा.
इंद्रायणी एक्स्प्रेस 30 सप्टेंबरपर्यंत सुरू
पुणे - प्रवाशांच्या सोयीसाठी उन्हाळी सुटीनिमित्त सुरू केलेली "पुणे-सोलापूर-पुणे' (इंद्रायणी एक्स्प्रेस) ही रेल्वेगाडी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंग यांनी दिली. पुण्याहून सकाळी साडेनऊ वाजता सुटणारी (0113) ही गाडी सोलापूरला दीड वाजता पोचेल, तर सोलापूरहून दुपारी दोन वाजता सुटणारी (0114) गाडी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पुण्यात पोचेल.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी खास रेल्वे गाडी
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी खामगाव, अमरावती येथील रेल्वेस्थानकावरून 28, 29 जून व एक, दोन जुलै या चार दिवस खास रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.
अमरावती येथून वरील चार दिवशी दुपारी दोनला नऊ डब्यांची गाडी सुटणार आहे. यात सहा डबे सर्वसामान्य, दोन स्लिपर कोच व एक एसएलआर राहील. ही गाडी बडनेरा येथे दोन वाजून 28 मिनिटांनी, मूर्तिजापूरला तीन वाजून पाच मिनिटांनी, अकोला येथे दुपारी चारला, शेगावला चार वाजून 40मिनिटांनी, जलंब येथे सायंकाळी पाचला पोहोचेल. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ. सुमंत देऊळकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.